श्रीकांत राऊत, झी मीडिया, नागपूर : ५२ वर्षीय नराधमाने १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नागपूर च्या पार्डी येथे उघडकीस आली आहे. सूत गिरणीत पर्यवेक्षक असलेल्या या नराधमाने तेथे काम करणाऱ्या तरुणीवर क्रौर्याची परिसीमा गाठणारे कृत्य केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुंगीच्या औषधींचा स्प्रे मारून बेशुद्ध केल्यानंतर गुप्तांगात स्टील रॉड टाकून १९ वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करणाऱ्या आरोपीला नागपूरच्या पार्डी पोलिसांनी गजाआड केले आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. योगिलाल रहांगडाले असे अटकेतील नराधमाचे नाव आहे. पीडित तरुणी आणि तिचा भाऊ पारडीतील सूतगिरणीत काम करतात. तेथेच रहांगडाले हा पर्यवेक्षक आहे. 



याच परिसरातील एका खोलीत पीडित तरुणी, तिचा भाऊ, अन्य एक तरुणी आणि रहांगडाले राहतात. घटनेच्या दिवशी तरुणीचा भाऊ बाहेरगावी गेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास रहांगडाले खोलीत आला. त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारल्यावर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर रहांगडालेने तिच्या गुप्तांगात स्टीलचा रॉड टाकला. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार करुन पसार झाला. 
     
तरुणी शुद्धीवर आल्यानंतर असह्य वेदना जाणवल्याने तिने आरडाओरड केली असता शेजारच्यांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तरुणीने पारडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गोंदिया येथून पसार आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणातील गुंगीच्या औषधींचा स्प्रे, आणि धातूचा रॉड आदी जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. 


गृहमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपुरात दररोज खून, बलात्कार, लुटपाट यासारखे गुन्हे घडत असल्याने क्राईम कॅपिटल अशी बनलेली नागपूरची प्रतिमा बदललेली नाही. त्यात अत्याचाराची हादरवणारी घटना घडल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.