नागपूर - महानगरपालिकेने पर्यावरणाच्या दृष्टीने नागपूरात अनोखी संकल्पना राबवली होती. पर्यावरणाची हानी रोखण्याच्या हेतूने 'आपली बस' ही बससेवा सुरु केली. मात्र शहर बससेवा संचलित करणाऱ्या कंपनीने सीएनजी पुरवठाच गेल्या काही दिवसांपासून ठप्प केला आहे. यामुळे महापालिकेने सीएनजी वर धावणाऱ्या 70 बस बंद केल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या 400 पेक्षा जास्त बस शहरात रोज धावतात. यापैकी 70 बसेस नागपूर महापालिकेने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने 2019 मध्ये सीएनजी करुन घेतल्या. या बसेस सीएनजीवर केल्या होत्या त्यावेळी सीएनजीचा दर प्रति किलो 60 ते 65 रुपये इतका होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील या ठप्प बससेवेमुळे प्रवाश्यांना त्याचा फटका बसला आहे. याशिवाय महापालिकेही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. रोमॅट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 70 बसला सीएनजी इंधनाचा पुरवठा केला जातो. गेल्या मार्च महिन्यापासून हा सीएनजी पुरवठा बंद करण्यात आला आहे. रोमॅट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने अगोदर शहर बससेवा देणाऱ्या ऑपरेटरपैकी ट्राव्हल टाईम ऑपरेटरचा पुरवठा बंद केला. त्यानंतर 7 एप्रिलला हंसा सिटीबस आणि 8 एप्रिलला आर के सिटीचा सीएनजी पुरवठा बंद केला आहे. आता यासोबत महापालिकेच्या सुद्धा सीएनजी पुरवठा ठप्प केल्याने 70 सीएनजी बसेस महापालिकेला सेवेतून काढव्या लागणार आहेत. 


दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतींत झालेल्या दरवाढीचा फटका सीएनजीच्या दराला बसला आहे. यामुळे नागपूर शहरात सीएनजीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. रोमॅट कंपनीने सीएनजी पुरवठा बंद केल्यानंतर महापालिकेने त्याबाबत अनेक नोटिसा या संबधित कंपनीला पाठवत पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही त्याच्यावर कंपनीकडून कोणताच तोडगा अद्याप तरी निघालेला नाही. आता महापालिका या प्रकरणात काय पावले उचलणार ते पाहणे महत्तवाचे ठरेल. 


अमर काणे, झी न्यूज नागपूर