पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर :  नागपुरात (Nagpur News) खासदार क्रीडा महोत्सव (Khasdar Krida Mahotsav) अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप (BJP) नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने स्कोअरला मारहाण केल्याच्या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलिसात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन यादव आणि करण मुन्ना यादव (Munna Yadav) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्याच्या कृत्याने खासदार क्रीडा महोत्सवाला गालबोट लागले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी तीन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने क्रिकेट सामन्यादरम्यान पंच आणि आयोजकांना मारहाण केली. भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव याने सामन्यादरम्यानच पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याने हा महोत्सव चर्चेत आला आहे.


नेमकं काय घडलं?


नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून, गुरुवारी नागपुरातील छत्रपती नगर येथे इलेव्हन स्टार आणि खामला स्टार या दोन्ही संघात क्रिकेटचा सामना खेळवला जात होता. यावेळी मुन्ना यादव यांचा मुलगा करण आणि त्याच्या साथीदारांनी थ्रो बॉलवरून अंपायरच्या निर्णयावर वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी या सामन्याचा स्कोअरर अमित होशिंग याने करण यादवला सामन्याचे नियम सांगितले. याचा राग आल्याने करणने अमितला शिवीगाळ करत बॅटने हल्ला केला. घाबरलेल्या अमितने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र करणने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.


आम्ही जो सांगतो तो निर्णय घ्या


याआधी देखील अनेक वेळा मुन्ना यादव यांच्या मुलांनी गुंडगिरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.  सामना सुरू असताना अर्जुनने थ्रो बॉलवर अंपायरशी वाद घातला. अंपायर आणि स्कोअरर यांनी समजावून सांगितले असता, आम्ही जे सांगतो तो निर्णय घ्या म्हणत त्याने मैदानात हैदोस घातला. त्यानंतर स्कोररला मारहाण करण्यात आली.


तीन दिवसांनी गुन्हा दाखल


हा सर्व मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. मुन्ना यादव यांच्या मुलाने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरभर त्याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा करण यादव आणि अर्जुन यादव यांच्याविरोधात नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात कलम 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आहे.