पोलिसांनी मोबाईल तपासला आणि...; मुलीला संपवण्यासाठी पित्यानेच रचला कट
सुरुवातीला मुलीनेच कंटाळून आपलं जीवन संपवले असे वाटत होते मात्र पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक खुलासा झालाय
नागपूरमध्ये (Nagpur) एका बापानेच आपल्या मुलीला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे वाटत होते. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. नातेवाईकांना अडकवण्यासाठी मुलीला संपवण्याची योजना वडिलांनी आखली होती. मात्र पोलिसांनी (Police) सखोल तपास करत हा सर्व प्रकार समोर आणलाय.
पोलिसांनी सांगितले की, 6 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या कळमना भागात 16 वर्षीय तरुणी तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. कळमना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांना मुलीच्या खोलीत पाच सुसाईड नोट सापडल्या आहेत. या आधारे तिची सावत्र आई आणि इतर काही नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तपासादरम्यान वडिलांचा मोबाईल तपासल्यानंतर संपूर्ण हत्येचा कटाचा उलघडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाईलमुळे समोर आले सत्य
पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या मोबाईमध्ये ए फोटो मिळाला ज्यामध्ये मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसत होती. वडिलांनी मुलीला आत्महत्येचे नाटक करण्यासाठी सांगितले होते. पण मुलीने आत्महत्येसाठी गळ्यात फास लावला तेव्हा तिच्या वडिलांनी फोटो काढला. कारण त्याला त्याचा सावत्र पत्नीला आणि नातेवाईकांना धडा शिकवायचा होता.
याआधी आरोपीने आपल्या मुलीला पाच सुसाईड नोट्स लिहायला लावल्या होत्या ज्यामध्ये नातेवाईकांची नावे लिहिली होती. तसेच, त्याच्या सांगण्यावरून मुलगीने आत्महत्येचे नाटक केले. मात्र आरोपीने स्टूलवर लाथ मारली आणि मुलीला गळफास बसला. यावेळी मुलीची लहान बहिणही तिथे उपस्थित होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.