अमर काणे, झी मीडिया नागपूर : नागपुरात (Nagpur News) गुरुवारी एका 71 वर्षीय निवृत्त पत्रकाराचा घराच्या आवारातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीपेठ परिसरात राहणारे जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर (Arun Phanshikar) हे सकाळपासून बेपत्ता होता. मात्र त्यांचा मृतदेह राहत्या घरातील विहीरीत आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहीरीबाहेर काढला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ पत्रकार, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरुण फणशीकर यांचा मृत्यूदेह राहत्या घरातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुण फणशीकर यांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कमेरेला ओढणीने दगड बांधल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अरुण फणशीकर हे बुधवारी रात्रीपासून बेपत्ता होते. मात्र गुरुवारी दुपारी गिरिपेठेतील त्यांच्या घरच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. गेली काही वर्षे ते असाध्य रोगाने आजारी होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही घातपात झाला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी सध्या दोन्ही बाजूंनी तपास सुरु केला आहे.


नेहमीप्रमाणे अरुण फणशीकर हे बुधवारीही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. मात्र ते घरी परतलेच नाहीत. त्यानंतर फणशीकर यांच्या कुटुंबीयांनी ते घरी न परतल्याने सीताबर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र दुसऱ्याच दिवशी दुपारी 2.30 च्या सुमारास अरुण फणशीकर यांचा मृतदेह त्यांच्याच घरातील विहिरीत आढळून आला. मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर फणशीकर यांच्या कमरेला ओढणीने दगड बांधला होता. या घटनेची माहिती मिळताच नागपुरात एकच खळबळ उडाली.


ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर हे अविवाहित असून गिरीपेठ येथील त्यांच्या घरी एकटेच राहत होते. मॉर्निग वॉकसाठी गेलेले फणशीकर घरी न परतल्याने त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात फोन करु ते हरवल्याची तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. मात्र त्यातून काही हाती लागले नाही. शेवटी श्वानपथकाची मदत घेण्यात आली. श्वान पथक फणशीकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर श्वान फणशीकर यांच्या घरातील विहीरीजवळ थांबले. पोलिसांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना काही तरी संशयास्पद वाटले. त्यामुळे त्यांनी अग्निशनम दलाला याची माहिती दिली आणि त्यानंतर अरुण फणशीकर यांचा मृतदेह बाहेर काढला.


दरम्यान, अत्यंत मितभाषी, हुकमी बातमीदार म्हणून अशी अरुण फणशीकर यांची ख्याती होती. हितवाद, इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्थान टाइम्स या तीन दैनिकांचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले होते.