अमर काणे, झी मीडिया, नागपूर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपुरात हत्यांची मालिका सुरूच आहे. नागपुरात गेल्या 48 तासात तीन तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सात जणांची हत्या झाली आहे. त्यामुळे उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का असे प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 48 तासात नागपुरातील नंदनवन आणि कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येच्या तीन घटना घडल्या आहेत, तर एक जण जीवघेण्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. पहिल्या घटनेत नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशपांडे लेआउट मध्ये उसने दिलेले पैसे परत मागितले या रागातून दोन आरोपींनी नीरज भोयर या तरुणाच्या डोक्यावर फरशीने वार करून त्याची हत्या केली. तर नीरजच्या मित्राला गंभीर जखमी केले आहे.


विलास ऊर्फ मटर रामकृष्ण वानखडे (हिवरीनगर) व नीरज भोयर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास संघर्षनगर झोपडपट्टीत नीरज आणि विशालवर विलासने आपल्या साथिदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात नीरज भोयर याचा मृत्यू झाला तर विशाल हा गंभीर जखमी झाला.


दुसरी घटना ही नंदनवन पोलीस स्टेशनचे हद्दीत घडली. सचिन उईके या ट्रकचालकाचा दर्शन भोंडेकर या ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. सचिन उईके कामावर येत नाही म्हणून ट्रक मालकाने त्याला जाब विचारला होता. तेव्हा दोघांमध्ये वाद होऊन झालेल्या हाणामारीत सचिन उईके या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता जुना बगडगंज चौकात सचिन उभा होता. त्यावेळी दर्शन तिथे आला. दर्शनने सचिनला कामावर येत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. सचिनला मानेवर जोरात फटका मारला. त्यामुळे सचिन बेशुद्ध पडून मृत पावला. पोलिसांनी या प्रकरणी दर्शन भोंडेकर या ट्रक चालकाला अटक केली आहे.


तिसरी घटना ही कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत गुलमोहर नगरात काल संध्याकाळी घडली.. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अज्जू शेख नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अज्जू शेख आणि करण व इतर तरुण गुलमोहर नगरात क्रिकेट खेळत असताना अज्जू शेख आणि करण या दोघांचा वाद झाला, थोड्या वेळानंतर करणने अज्जूवर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली...


दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला नागपुरात एका नंतर एक हत्येच्या चार घटना घडल्या होत्या.. त्यामुळे फेब्रुवारीच्या दहा दिवसात हत्येच्या 7 घटना घडल्याने नागपूरात सुरू काय आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे..