अमर काणे, झी मीडिया, नागपूर : 21 व्या शतकात आजही समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे. एक प्रगत राज्य अशी ओळख असण्याबरोबरच, पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ठाशीव ओळख. पण या पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचा कळस पाहिला मिळतोय. नागपूरमध्ये अंधश्रद्धेची अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण केली. यात सहा वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.


नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे आणि त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलगी सतत आजारी होती आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. पण त्यांनी मुलीला डॉक्टरकडे न नेता एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने  तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते... मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता... 


शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली.. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.


आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचे मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढले.  रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचे मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत रा मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवले याची माहिती मिळवली. मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आले त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. याप्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.