नागपूर : जर तुम्ही एखाद्या ब्रँडवर विश्वास ठेऊन खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान... कारण तुम्हाला मिळत असलेले खाद्यपदार्थ बनवताना योग्य ती काळजी घेतलीच जात असेल असं नाही. नागपूरच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये खाद्य पदार्थात चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सध्या हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.


नागपूरच्या अजनी परिसरातील प्रसिद्ध असलेल्या 'हल्दीराम' हॉटेलमधील सांबारमध्ये चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळलं. नागपूरच्या अग्निहोत्री नावाच्या ग्राहकानं सांबार ऑर्डर केलं होतं. त्यावेळी समोर आलेल्या ताटात चक्क छोटी पालच त्यांना आढळली. हे पाहून ग्राहकाला पहिल्यांदा धक्काच बसला.
 
अग्निहोत्री कुटुंबातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. दरम्यान यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असून, हे हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.