नागपूर: कर्तव्यदक्ष आणि कोणाचीही तमा न बाळगता धडाडीने निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शनिवारी नागपूर महानगरपालिकेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. महापौरांनी हा प्रस्ताव फेटाळला असला तरी आज नागपूर महानगरपालिकेत वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. यावेळी नगरसेवकांच्या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे संतप्त होऊन सभागृहातून निघून गेले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचे नगरसेवक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज आहेत. अखेर आज काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी पालिका सभागृहात तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र, यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. 


नागपुरात कोरोनाला आळा घालण्यात ‘मुंढे पॅटर्न’ यशस्वी


भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी 'सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा' असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले.