पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : दारूसाठी (alcohol) पैसे न दिल्यानं व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या आईलाच संपवल्याचा प्रकार नागपूरात (Nagpur Crime) उघड झालाय. निर्दयी मुलाने विळ्याने आईचा गळा चिरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरच्या (Nagpur News) जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने सगळ्यांना हादरून सोडलं. बेरोजगार (unemployed) आणि दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने पैशांसाठी आईचा खून केला. यानंतर आरोपी मुलगा यशोधरा पोलीस ठाण्यात शरण आला. मुलाने पोलिसांसमोर त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्येनंतर परिसरात खळबळ


नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या वनदेवी नगर परिसरात रविवारी संध्याकाळी 7 वाजता हा सर्व प्रकार घडला आहे. मुलानेच आईची हत्या केल्याची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. गोविंद काटकर असं निर्दयी मुलाचं तर विमलाबाई काटकर असं मृतक महिलेचं नाव आहे. तर आरोपी मुलाचे वडील मोलमजुरी करत होते. मात्र काही वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले.


विळ्याने चिरला गळा


रविवार सकाळपासूनच गोविंद दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागत होता. पण आईनं त्याला नकार देत पैसे दिले नाहीत. अखेर गोविंदला राग अनावर झाला अन् त्याने जन्मदात्या आईचा विळ्याने खून केला. गोविंदने आईच्या गळ्यावर विळा चालवल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. विमलबाई काटकर हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडून होता आणि त्यातच त्यांचा जीव गेला. मात्र गोविंद भानावर आल्यावर त्याला आपली चूक कळली. त्याने थेट पोलीस ठाणे गाठत आपण आईचा खून केल्याची कबुली दिली आणि पोलिसात आत्मसमर्पण केलं. जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत गोविंदला अटक केली आहे.


हत्येनंतर घरातच होता बसून


दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर गोविंद नैराश्यात गेला होता. यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले.  बेरोजगार असल्याने तो वारंवार आईकडे दारुसाठी पैसे मागत होता. यामुळे त्याची आईसुद्धा त्याला कंटाळली होती. रविवारी पैसे न दिल्याने त्याने विळ्याने आईच्या गळ्यावर हल्ला करून खून केला. आईचा खून केल्यानंतर बराच वेळ तो घरातच बसून होता. त्यानंतर त्याने  पोलीस ठाण्यात जात घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी गोविंदला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. 


हत्या केली तेव्हा गोविंद दारुच्या नशेत नव्हता. त्यामुळे वेगळीच शंका उपस्थित होत आहे. पोलिसही इतर कारणांचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन काही पुरावे गोळा करत पुढील तपास सुरु केला आहे.