नागपूर : नागपूर मेट्रोच्या सेवेत आणि वैभवात आज आणखी भर पडली. सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गिकेवरील सेवा तसंच फ्रीडम पार्क नागपुरकरांसाठी खुलं झालं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा मंत्री  हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या 1.6 किमी लांबीच्या मार्गाचं उदघाटन स्थानिक झिरो माईल इथं झालं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून केंद्रीय मंत्र्यासोबत या मार्गिकेवर धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेलला झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र मेट्रोची सफर केली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या सर्व दिग्गज नेत्यांसह इतर नेत्यांनीही मेट्रो सफरीचा आनंद लुटला.



यावेळी भाषणात बोलताना नितीन गडकरी यांनी राज्याच्या विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी केंद्र सरकारतर्फे दिला जाईल तसंच मुंबई ठाण्याच्या विकासाकरिता अतिरिक्त एक लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी दिलं.



सीताबर्डी-कस्तुरचंद पार्क या 1.6 किलोमीटर लांब मार्गिकेवरील मेट्रो प्रवास आज पासून सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडेल जाणार आहेत. हा मार्ग नागपूर शहरातील विधान भवन, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरीस कॉलेज, अशा अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो. नागपुरात स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं हे झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन देशातील अशा प्रकारचं पहिलं मेट्रो स्थानक आहे जे भव्य 20 मजली इमारतीचा भाग असेल आणि त्याच्या चौथ्या मजल्यावरून मेट्रोरेल धावेल.



झिरो माईल स्थानकाच्या भोवताली 40,000 चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्कचं निर्माण करण्यात आलं असून याचंही उद्घाटन आज पार पडलं. या स्थानकाचं नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन असं करण्यात आलं आहे. यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. युद्धात वापरलेला टी-5  रणगाडा देखील इथं नागपूरकरांना बघता येणार आहे तसंच फ्रिडम पार्कच्या आत अँफी थियेटरही आहे.