पुण्याच्या मागून येऊन नागपूर मेट्रो पुढे
नागपूर मेट्रोची ट्रायल रनसाठी सज्ज झालेली असताना पुणे मेट्रोला मात्र अजून तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नागपूर : नागपूर मेट्रोची ट्रायल रनसाठी सज्ज झालेली असताना पुणे मेट्रोला मात्र अजून तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे मेट्रो प्रत्यक्षात कशी असेल याचं प्रेझेन्टेशन सोमवारी महामेट्रोने दिलं. मात्र यासाठी पुणेकरांना अजून तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मुळात नागपूर आधीच पुणे मेट्रोला परवानगी देण्यात आली होता. मात्र अनेक वादांचे अडथळे पार करत असलेली पुणे मेट्रो अजून तीन वर्षांसाठी लटकली.
राजधानी मुंबईपाठोपाठ अखेर उपराजधानी नागपूरमध्येही मेट्रो धावणार आहे. येत्या 30 सप्टेंबरला दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्री आणि नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
विविध शासकीय संस्था या ट्रायल रनची चाचणी करणार असून सुरक्षेच्या विविध मानकांवर यावेळी चाचणी होणार आहे. या चाचणीतून निघालेले निष्कर्षांच्या आधारे अपेक्षित ते बदल केले जातील.
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गावर, मिहान डेपो ते विमानतळ या सुमारे साडे पाच किलोमीटर मार्गावर ही चाचणी घेण्यात येणार आहे. सुरूवातीला ट्रायल रन घेतल्यानंतर वर्षअखेरीपर्यंत नागपूरकर प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू होणाराय.
याकरता प्रवासी भाडंही लवकरच निश्चित केले जाणार आहे. तर पुढच्या टप्प्यात सीताबर्डी येथून प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. सुमारे साडे आठ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ ३१ मे २०१५ रोजी रोवली गेली होती.