Nagpur Crime News:  नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच तिच्या सासऱ्यांची हत्येची सुपारी दिली. सुरुवातीला सासऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, एक संशय आणि सुनेचा संपूर्ण प्लान फसला. पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 मे रोजी नागपुरच्या मानेवाडी परिसरात पुरुषोत्तम पट्टेवार वय 82 वर्षे यांना एका कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. या घटनेनंतर पट्टेवार यांच्या भावाने पोलिसांकडे मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी जेव्हा त्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटिव्हीची पडताळणी करण्यास सुरुवात केली. तेव्हा या सीसीटिव्ही पाहिल्यानंतर त्यांनी कार ड्रायव्हर नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला. कार चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्चना पुट्टेवार यांनी पैसे देऊन त्यांच्या सासऱ्यांचा अपघात घडवून आणण्यास सांगितले होते. त्यांचा हा खुलासा ऐकुन पोलिसांनाही धक्का बसला. 


पोलिसांनी सुपारी किलिंग प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम यांच्या 300 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना हिचे नजर होती. विशेष म्हणजे अर्चना या सरकारी अधिकारी असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हे मुलगी योगिता आणि तिच्या मुलांच्या नावे संपत्ती करणार असल्याची कुणकुण अर्चना यांना लागली होती. त्यामुळं संपत्ती हातातून जावू नये यासाठी तिने हा सगळा कट रचला. 


नागपूर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हायप्रोफाइल आहे. नागपुर क्राइम ब्रँच या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींनी पोलिसांनी अटक केली आहे. लवकरच या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.