नागपूरमध्ये तरुण वयाच्या मुलीच नाही, तर ६५ वर्षांची आजीही असुरक्षित
बलात्काराच्या दोन घटनांनी नागपूर हादरलं आहे, एका अल्पवयीन मुलीवर आणि ६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्काराची घटना उडकीस आली आहे
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नागपुरात सामूहिक बलात्काराच्या दोन घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामुहिक बलात्काराची पहिली घटना 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत घडली असून तर दुसरी घटना 65 वर्षाच्या एका वृद्ध महिलासोबत घडली आहे. बलात्काराच्या दोन घटनांनी नागपूर हादरलं आहे.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. याचा गैरफायदा या तरुणाने घेतला. तीन दिवसांपूर्वी आरोपी तरुण मुलीला फिरवण्यासाठा मोटरसायकलवरुन बाहेर घेऊन गेला.
पण त्याच्या मनात काही वेगळच होतं, त्याने मुलीला फिरण्यासाठी न नेता एका फ्लॅटमध्ये नेलं, तिथे तिला गुंगीचे पदार्थ खायला देऊन तिच्यासोबत बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. इतक्यावरच तो थांबला नाही, त्याने आपल्या ३ मित्रांनाही बोलवलं. आणि त्यांनीही मुलीवर अत्याचार केले.
आरोपींनी रात्रभर त्या तरुणीला गुंगीच्या अवस्थेत फ्लॅटमध्ये ठेवलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी पाठवून दिलं. या घटनेनंतर जवळपास आठ दिवस मुलगी गप्प होती. पण त्यानंतर तिच्या तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी तिला डॉक्टरकजे नेलं असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्थानकात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवणअयात आला आहे. चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार
नागपूरमधली बलात्काराची दुसरी घटनाही हादरवून टाकणारी आहे. ८ फेब्रुवारीला पहाटे नागपूरच्या लावा परिसरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेच्या घरी दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. घरात एकट्याच रहाणाऱ्या वृद्धेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने वाडी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.