कर्ज फेडण्यासाठी जोडप्याने तरुणीचे अपहरण केले, पण एका चुकीमुळं प्लान फसला अन्...
Nagpur News: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने तरुणीचे अपहरण करत खंडणी मागितली. मात्र त्याचा हा प्लान त्यांच्यावरच उलटला
Nagpur Crime News: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जोडप्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी असल्याचे सांगत एका तरुणीचे अपहरण केले आहे. मात्र पोलिसांनी वेळीच पावले उचलत तरुणीची सुटका केली आहे. तर, प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. स्वप्नील मरास्कोल्हे आणि चेतना अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अपहरण करण्यात आलेल्या मुलीची ओळख झलक (23) अशी पटली आहे.
कामावरुन परतत असताना केले अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झलकचे वडिल पारशिवनी येथील कोळश्याच्या खाणीत काम करतात. तर तरुणी हिंगनी येथील एका कंपनीत कामाला आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील आणि त्याची प्रेयसी झलकवर लक्ष ठेवून होते. 20 मार्च रोजी रात्री ऑफिसमधून परतत असताना झलकने तिच्या आईला फोन केला होता. तिने आईला सांगितली की, कंपनीतील तिचे काम संपले आहे. थोड्याच वेळेत घरी येण्यासाठी निघेल. 10 वाजेपर्यंत घरी येईल, असं तिने आईला सांगितले होते. ती मोपेडनरुन घरी जाणार होती.
झलक घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर दोघा आरोपींनी तिला अडवले. दोघांनी तिला ते एनआयए अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तुम्हाला चौकशीसाठी आमच्यासोबत यावं लागेल, अशी भीती तिला घातली. झलक त्यांचे बोलणे ऐकून घाबरली होती. दोघांनी झलकला तिच्याच मोपेडवरुन बसवून हिंगणी येथील डिमार्टच्या मागे असलेल्या त्यांच्या घरी नेले. त्यानंतर तिला एका खोलीत बंद करुन ठेवले. बराच वेळ झाला तरी झलक घरी आली नाही तसंच, तिचा फोनदेखील बंद येत होता. त्यामुळं तिचे घरचे चिंतेत होते.
झलकच्या अपहरणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी स्वप्निलने झलकच्या आईच्या मोबाइलवर संपर्क केला आणि तिच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगितले. जर तुमची मुलगी तुम्हाला सुरक्षित हवी असेल तर 30 लाखांची खंडणी द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत तर तिच्या जिवाचे काही बरं वाईट करु, अशी धमकी त्यांना देण्यात आली. फोनवरची धमकी ऐकून झलकची आई घाबरली त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी लगेचच प्रतापनगर पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली.
झलकच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमअतर्गंत गुन्हा दाखल करुन तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. क्राइम ब्राँचचे डेप्युटी कमिश्नर गोयल, सर्कल वन के डेप्युटी कमिश्नर अनुराग जैन यांच्या अध्यक्षतेखाली युनिट वनचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, प्रतापनगर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजीत सावंत यांच्या संयुक्त टीमने लोकेशनच्या आधारे स्वप्निलच्या घरी छापा मारला. त्यानंतर तिथे झलकचा बंदिस्त करुन ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी तिची सुटका करत जोडप्याला अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हा मार्ग वापरल्याचे पोलिसांकडे कबुल केले आहे.