नागपूर : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला आळा बसण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आपण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन अधिकाधिक जणांना याची लागण होत असल्याचे समोर येत आहे. नागपूरात देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. इथे आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं हा संसर्ग झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीला कामानिमित्त गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्तींची काल तपासणी केली होती. यामध्ये यातील १७ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 
नागपूरात आता कोरोना रुग्णांची संख्या १० झाली आहे. 


राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे ५ रुग्ण आढळ्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६० वर पोहचली आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्येही १ नवा कोरोना रुग्ण आढळला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५९ झाली आहे.



मुंबईत आतापर्यंत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून अनेक रुग्ण बरे होत असल्याचंही चित्र आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन असलं तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. तरीही नागरिक बाजारात मोठी गर्दी करताना दिसतात. सरकारकडून घरीच राहण्याचं सतत आवाहन करण्यात येतंय. 


मात्र नागरिक याकडे तितकंस गंभीरपणे पाहत नसल्याचं चित्र आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस घरीच राहावं. आगामी १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे असून या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडूच नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.


राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर गेलाय. तर संपूर्ण देशात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.