अमर काणे, झी २४ तास, नागपूर : नागपुरातील मिशी प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. ग्राहक किरण ठाकूर यांच्या पोलीस तक्रारी नंतर आता फ्रेंड्स जेन्ट्स पार्लरचा कर्मचारी आकाश चौधरी यानेही पोलीस तक्रार दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता जास्त चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मिशीला कात्रीचा धक्का लागल्यानंतर किरण ठाकूर घरी गेला होता. 2 तासांनी येऊन त्यानेच पूर्ण मिशी कापून द्या असे सांगितले, म्हणून मिशी कापली असा तर्क या कर्मचाऱ्याने त्याच्या तक्रारीत दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कन्हानच्या फ्रेंड्स जेन्टस पार्लरमध्ये किरण ठाकूर गेले होते. तिथे त्यांच्या मिशीवरच संक्रांत आली. कारागिराने न विचारताच मिशीवरून वस्तरा फिरवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे हे आरोप केशकर्तनालयाच्या मालकाला अमान्य आहेत. जोपासलेली मिशी उडवली जाणं हे दुःख ठाकुरांना आणखी एका कारणासाठी टोचतं आहे. केशकर्तनालयाच्या मालकाविरोधात आता किरण ठाकूर यांनी पोलीस तक्रार नोंदवली आहे. एकूणच सध्या नागपुरात हा मिशीवाद चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. मिशी हा अभिमानाचा मुद्दाच छाटल्यामुळे ठाकुरांची चीडचीड होते आहे. पण यातून इतरांची मात्र करमणूक होते आहे.