प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न यशस्वी; २००० तज्ज्ञ डॉक्टरसह परिचारिकांची टीम सज्ज
कोरोना नियंत्रणासाठी २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
नागपूर : कोरोना नियंत्रणासाठी २००० तज्ज्ञ डॉक्टरसह २५०० परिचारिकांचे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. नागपूर विभागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे. हा नागपूर प्रशिक्षणाचा पॅटर्न यशस्वी ठरला आहे. कोरोना विषाणूच्या प्रभावी व परिणामकारक नियंत्रणासाठी राष्ट्रीय व राज्यपातळीवर विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
नागपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन विभागातील ५ हजार ८०८ तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात दहशत निर्माण झाल्यामुळे या विषाणूच्या नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे.
सर्वंकष आराखडा तयार
नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांच्या भविष्यातील उद्भवणाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन त्यानुसार सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणासाठी विभागस्तरावर तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांच्या आराखड्यानुसार ३९३ तज्ज्ञ डॉक्टर, १ हजार ९५७ डॉक्टर, २ हजार ४८८ परिचारिका व ९७० वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.
कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरपासून स्वतंत्र कोविड एअर सुसज्ज रुग्णालय तयार करण्याचा समावेश आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचा अभ्यास करुन त्यानुसार राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर चालविण्यासह इतर आवश्यक प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आयसीयू व एचडीयू सुविधांचा अभ्यास करुन त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन त्यानुसार प्रशिक्षण ५ हजार ८०८ वैद्यकीय अधिकारी व संलग्न कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारचा उपक्रम राज्यात केवळ नागपूर विभागात राबविण्यात आल्यामुळे नागपूर शहर संपूर्ण विभाग कोरोनावर प्रभावी व परिणामकारक उपचाराच्या सुविधा निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.
असा आहे प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न
- विभागात २८८ विशेषज्ञ, ९९६ एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर, २ हजार २८० परिचारिका तसेच ९९६ वैद्यकीय सहाय्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ
- नागपूर शहरात तसेच जिल्ह्यात १८० विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) ६०० एमबीबीएस, बीएएमएस डॉक्टर, १ हजार ३८० परिचारिका तसेच ६०० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात तसेच राज्यात सर्वाधिक
- शासकीय आरोग्य संस्थांबरोबरच १६ खाजगी रुग्णालये, वेस्टर्न कोल फिल्ड, आयुर्वेदिक महाविद्यालय, महानगरपालिका व जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
- कोविड रुग्णालयातील कर्मचारी सतत १५ दिवस कामावर असल्यामुळे त्यांना विश्रांती देऊन त्यांच्या ऐवजी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवांचा सुद्धा या प्रशिक्षणामध्ये समावेश करण्यात आला