नागपूर : एसबीआय (SBI ), वेस्टर्न कोल फिल्ड ( Western Coal Field ) या सारख्या शासकीय व निम शासकीय विभागात नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा नागपूर ग्रामीण ( Nagpur Police ) पोलिसांनी पर्दाफाश केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेरोजगार तरुणांना फसविणारी ही टोळी आंतरराज्यीय असून यात महाराष्ट्र ( Maharashtra ) , बंगाल ( Bangal )  आणि बिहारमधील ( Bihar ) आरोपींचा समावेश आहे. रेल्वे ( Railway ), एसबीआय (SBI ) , वेन्टर्न कोल फिल्ड या सारख्या शासकीय किंवा निमशासकीय विभागात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली विदर्भातील अनेक तरुणांची या टोळीने फसवणूक केली आहे.


समाजात चांगली ओळख आणि प्रतिष्ठा असलेले दलाल यांना गाठून त्यांच्यामार्फत उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांशी ही टोळी संपर्क साधायची. त्यांना शासकीय, निमशासकीय विभागात नोकरीचे आमिष दाखवायची. त्यानंतर व्हाट्सअँपच्या माध्यमातून मुलाखत आणि नियुक्तीचे बोगस पत्र पाठवून पैसे वसूल करायचे. एकदा पैसे मिळाले की नंतर पुन्हा कधीच त्या तरुणाला न भेटणे ही या टोळीची कार्यपद्धती होती.


या टोळीविरोधात राज्यातील अनेक पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला असता नागपूर ग्रामीण पोलिसांनी या टोळीची सूत्रधार शिल्पा पालपूर्ती हिच्यासह दोन जणांना अटक केलीय.


मुख्य सूत्रधार शिल्पा पालपूर्ती ही महिला काही काळ मलेशियाला नोकरीला होती. आतापर्यंत या भामट्यांच्या टोळीने नागपुरात 12 तरुणांची 1 कोटी 30 लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरु असून फसणूकीचे खूप मोठे प्रकरण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.