अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरपासून अवघ्या १५ ते २० किलोमीटरवर असलेल्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रातला रस्ता वाघामुळे चर्चेत आला आहे. १५ तारखेला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास इथे मजुराला वाघ दिसला होता. त्यानंतर १६ तारखेला पुन्हा एकदा याच परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचं मिहानमधल्या सुरक्षा रक्षकाने सांगितलं. यानंतर आपला दरारा पसरवणाऱ्या या वाघाचा शोध सुरु झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग दोन दिवस वाघ दिसल्याच्या घटनानंतर मिहान प्रशासन सतर्क झालं. वाघाच्या पंजाचे ठसेही आढळून आले. वनविभागाची टीमही परिसरात दाखल झाली असून या मार्गावर आता जवळपास २५ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेत.


मिहान विशेष आर्थिक क्षेत्र ४ हजार २५ हेक्टर एवढ्या विस्तीर्ण परिसरात आहे. इथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं आहेत. तर अनेक कंपन्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे, त्यामुळे हजारोंच्या संख्येने कर्मचारी, अधिकारी आणि मजूर वर्ग इथे काम करायला येतात. त्यामुळे त्यांच्या मनात आता वाघाची भीती निर्माण झाली आहे.


काही दिवसांपूर्वी नागपूरनजिकच्या फेटरी गावाजवळही वाघाचा वावर होता. तेव्हा वनखात्यानं वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेनं जाण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आलं होतं. आता मिहानमधल्या या वाघाला पिटाळून लावण्यात वनविभागाला यश येतं का? हे पाहणं इट्रेस्टिंग ठरणार आहे.