अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सध्याच्या स्पर्धेच्या युगात मैदानी खेळांचे प्रमाण फार कमी झाले आहे. पूर्वी आपण अनेक धावण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील. त्यामध्ये १०० मीटरची वेगवान शर्यत असो, नाहीतर खेळाडूचा स्टॅमिना पाहणारी मॅरेथॉन. पण या दोन्ही धावण्याच्या शर्यतींना मागे टाकत नागपुरात चक्रासन शर्यत रंगली होती. ही अनोखी स्पर्धा पाहून प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण तर नक्कीच झाले आसतील.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नक्की काय चाललंय? हे झोंबी तर नाहीत ना? हा काही भुताटकीचा प्रकार तर नाही ना? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण काही मुळीच नाही. ही आहे नागपुरात रंगलेली चक्रासन शर्यत. खरं तर योगासनातला चक्रासन हा फारच अवघड प्रकार आहे. मात्र हे लहानगे स्पर्धक पाहा, अगदी लिलया चक्रासनात धावताना दिसत आहेत. 



केवळ मजेसाठी नाही, तर शारिरीक लवचिकता आणि चपळता वाढावी, दृष्टी, स्नायू, हाडं मजबूत व्हावीत, यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. नागपूरच्या त्रिमूर्तीनगर भागात राजीव गांधी उद्यानात रविवारी राज्य स्तरीय चक्रासन दौड स्पर्धा झाली.  


त्यात विदर्भातून १२० स्पर्धक सहभागी झाले होते. १०, २० आणि ३० मीटर अंतराची ही दौड पार पाडण्यासाठी स्पर्धकांना फारच कौशल्य दाखवावं लागलं. चक्रासनात धावण्याच्या या स्पर्धेत लहानग्यांची लवचिकता दिसली. या योगपटूंचं कौशल्य योग्य पद्धतीनं वापरलं तर नक्कीच भारताचा जागतिक स्तरावरही वेगळी ओळख मिळू शकेल.