अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्या 56 वर्षांच्या होत्या. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बेलतरोडी इथल्या फॉर्च्युन श्री अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आत्महत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन महिन्यांपूर्वी डॉ. ज्योत्सना मेश्राम यांच्या पतीचं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर त्या मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जातंय. त्यांचे पती सुधीर मेश्राम हे माजी कुलगुरु होते. 


डॉ. ज्योत्सना मेश्राम अष्टविनायकनगर जयताळा इथं रहात होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या बेलतरोडी इथल्या नातलगांकडे रहायला आल्या होत्या. त्यांना एक मुलगा असून तो अमेरिकेत राहतो. आठ दिवसांपूर्वीच त्या अमेरिकेहून आपल्या मुलाला भेटून परत आल्या होत्या. 


सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरील किचनच्या गॅलरीतून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख असल्याने नॅकची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. नॅक कमिटी दौऱ्यावर येणार होती.