मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल पूर्ण करण्यासाठी आता नागपूर विद्यापीठ पुढे सरसावले आहे. मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील उत्तरपत्रिका नागपुरात तपासल्या जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेज आणि शिवाजी सायन्स कॉलेजच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये पेपर तपासणी केली जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीचं काम करत आहेत. एवढ्या कमी वेळेत दोन लाख उत्तरपत्रिका तपासणीचं आव्हान प्राध्यापकांसमोर आहे. मात्र दिलेल्या कालावधीत काम पूर्ण होईल असा विश्वास उत्तरपत्रिका तपासणी समन्वयकांना आहे.


मुंबई विद्यापीठातल्या पेपर तपासणी घोळाप्रकरणी विधान परिषदेत बोलताना शिक्षणमंत्री तावडेंनी ३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू असं सांगितलं. हे अशक्यप्राय आव्हान तावडेंनी स्वीकारलंय. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं जरी तावडे सागंत असले तरी आता वेळ निघून गेली आहे.  शिवाय इतक्या कमी वेळात लाखो पेपर कसे तपासले जाणार? जरी तपासले गेले तरी ते किती अचूक पद्धतीने तपासले जातील हाही प्रश्न आहेच.


दरम्यान चुक कुठे झाली आणि कुणी केली याची चौकशी ३१ जुलैनंतर केली जाणार असल्याचंही तावडेंनी सांगितलंय. विरोधकांच्या प्रश्नांना मात्र तावडेंनी गुळमुळीत उत्तरं दिली.


३१ जुलैपुर्वी गेल्यावर्षीचे निकाल जाहीर करा असा आदेश राज्यपालांनी काढला होता. विद्यापीठात दरवर्षी १८ लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातात. आता ३१ जुलैच्या आत जर निकाल लावायचे असतील, तर दिवसाला ६० हजार उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करव्या लागणार आहेत. त्यामुळे आता प्राध्यपकांना त्यांचं शिकवण्याचं काम सोडून तपासणीच्या कामाला जुंपण्यात आलं आहे.


शिक्षणमंत्री आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे.