प्रणव पोळेकर, झी २४ तास, रत्नागिरी : मुलगी जन्मली की ती काहींना नकोशी होते... इतकी की तिचं नावही तसंच ठेवलं जातं. पण रत्नागिरी जिल्ह्यातील एक 'नकोशी' अशी आहे की ती सर्वांना हवीहवीशी वाटते... तिच्या धडाडीची दखल थेट महिंद्रा समुहाचे मालक आनंद महिंद्रा यांना घ्यावी लागलीय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या नकुसा म्हसळा आहेत. फक्त नववीपर्यंत शिकलेल्या. पण व्यावसायिक वापरासाठी बोलेरोचं लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत. ज्यानं मला हा फोटो व्हॉट्सअॅप केलाय त्याला फारशी माहिती नाही... कुणी मला तिची माहिती देईल का? मला तिची कहाणी ऐकायला आवडेल' असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं होतं. त्यांना नकुशा म्हसळांबद्दल जाणून घ्यायचंय...


'झी २४ तास'नं शोधलं या 'नकुसा'ला


त्यांना आणि सगळ्या महाराष्ट्राला आम्ही सांगतोय कोकणातली घाटवळणं महिंद्रा पिकअपमधून लीलया पार करणाऱ्या या वाघिणीबद्दल... गेली २० वर्षं नकुसा भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. रत्नागिरी, लांजा, राजापुरातल्या बाजारांमध्ये स्वतः महिंद्रा पिकअपमधून चार ते पाच टन भाजी घेऊन जातात. गेल्या वीस वर्षांपासून घाटवळणातून प्रवास चालू आहे.


बाईचं काम म्हणजे केवळ चूल आणि मूल... असा समज असणाऱ्या पुरूषप्रधान समाजाच्या डोळ्यात नकुसा यांनी झणझणीत अंजन घातलंय.



मुलगी नको होती म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी नाव नकुसा ठेवलं असेलही... पण त्यांना आपला जन्म नकोसा कधीच वाटला नाही. कोकणातल्या लाल मातीमधल्या या सुपरवुमनची दखल थेट महिंद्राच्या मालकांना घ्यावीशी वाटली ती उगीच नाही... केवळ नववीपर्यंत शिक्षण असलं तरी नकुसांची धडाडी बघून आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना विनामूल्य लायसन्स काढून दिलं. त्यांच्या जिद्दीला आणि कोकणातल्या नागमोडी वाटेवरच्या संघर्षाला 'झी २४ तास'चा सलाम...