औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव?
औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
विमानतळ नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावी, असे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात आले आहे.
तर दुसरीकडे मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती देताना काँग्रेसचे मंत्री असलेल्या अमित देशमुख यांच्या खात्याशी संबंधित निर्णयाची माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला. सीएमओने औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटा आणि पदांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ट्विटरवर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांच्या फोटोसह हे प्रसिद्ध केले. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे. त्यामुळे आता अमित देशमुख याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून महाविकास आघाडीला टोला लगावला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्ण खाटा
दरम्यान, औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविणे तसेच नव्याने 360 पदे निर्माण करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी 24 कोटी 64 लाख 24 हजार 788 इतका खर्च येईल.
या निर्णयामुळे सध्याचे अस्तित्वात असलेल्या 100 खाटांमध्ये 165 खाटा वाढवून 265 खाटांचे रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयासाठी गट अ ते गट ड ची 316 नियमित पदे आणि 44 बाह्यस्त्रोताने अशी एकूण 360 पदे निर्माण करण्यात येतील. हे रुग्णालय सप्टेंबर 2012 रोजी सुरु करण्यात आले होते. यासाठी केंद्राचा 60 टक्के व राज्याचा 40 टक्के वाटा आहे.
दुसरीकडे काँग्रेसचा विरोध
मुख्यमंत्री कार्यालयानं औरंगाबादसंदर्भात मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती देताना संभाजीनंगर असा उल्लेख केल्यामुळे काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. त्यामुळे कोणत्याही शहराच्या नामांतराला काँग्रेस ठाम विरोध असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलंय. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याशी संबंधित निर्णयाची माहिती देताना सीएमओनं औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला.