मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे होणार नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. त्याचवेळी ज्या ठिकाणी या प्रकल्पाचे स्वागत होणार असेल तर त्याठिकाणी तो करावा, आमचा याला विरोध असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. या प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेने राजापूर परिसरातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला होता. दरम्यान, हा प्रकल्प भाजपला हवा होता. भाजपने नमते घेत शिवसेनेची युती केली. त्यामुळे भाजपला शिवसेनेपुढे झुकावे लागले. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी हा प्रकल्प हवा म्हणून बंडाचे निशाण फडकवले आहे. प्रकल्पाच्याबाजुने उभे राहत निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणाही केली. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ जठार यांची समजूत काढणार काय, याची उत्सुकता आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका जठार यांनी घेतली आहे.


कोकणातील भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रकल्प समर्थ भूमिकेनंतर शिवसेनेतून तीव्र विरोध वाढला. नाणार प्रकल्प झालाच पाहिजे हे ठणकावून सांगणे हा नीचपणा जितका तितकाच निर्घृणपणा आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.


नाणार रिफायनरी रद्द करण्याच्या निर्णयाचे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी स्वागत केले आहे. सौदी अरेबियातील सौदी आराम्को कंपनी या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार होती. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची ५० टक्के भागीदारी असणार होती. मात्र, आता हा प्रकल्प रद्द करण्यात येण्यासाठी प्रयत्न झाल्याने ही गंतवणूक महाराष्ट्रात होणार का, याची उत्सुकता आहे.