वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा मृत्यू
Nanded News : नांदेडमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. वाढदिवसावरुन परतत असताना गाडी पुलावरुन खाली कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.
सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. भरधाव गाडी पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनं नांदेडमध्ये शोककळा पसरली आहे. वाढदिवस साजरा करुन परतत असतानाच या कुटुंबावर काळाने घाला घातला.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात हा अपघात घडला. भोकर - उमरी मार्गावरील मोघाळी पुलावरून चारचाकी ब्रिझा गाडी कोसळली. मध्यरात्री हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत आणि जखमी सर्व जण भोकर तालुक्यातील रेणापूर येथील रहिवाशी आहेत. भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहतात. भोकर येथे नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने सगळेजण भोकर येथे आले होते. कार्यक्रम आटोपून परत तेलंगणाला जाताना माघोळी पुलावरून त्यांची गाडी कोसळली. तिघांचा जागेवर तर दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृतामध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. सहा जखमींवर उपचार सुरु आहेत.
भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंब हे वनेल, नवीपेठ येथे विटभट्टीच्या कामाला होते. भालेराव कुटुंब भोकर शहरातील शेखफरीदनगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी गेले होते. वाढदिवस साजरा करुन रात्रीच्या वेळी ब्रिझा गाडीने 11 जण वनेल येथे परतत होते. त्याचवेळी उमरी रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरुन त्यांचे वाहन पुलावरून खाली कोसळले.
या अपघातात सविता शाम भालेराव (25), रेखा परमेश्वर भालेराव (30), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (30) प्रिती परमेश्वर भालेराव (8) आणि सुशील मारोती गायकवाड (7) अशी मृतांची नावे आहेत. तर दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (8), प्रितेश परमेश्वर भालेराव (8), शोहम परमेश्वर भालेराव (7), श्याम तुकाराम भालेराव (35), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव (28), परमेश्वर तुकाराम भालेराव (28), श्रीकांत अरगुलवार हे जखमी झाले आहेत. जखमींना नांदेडला उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. तर काही जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.