नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे अशोकरावांवर शरसंधान
अशोकराव स्वत:चेच भले करण्यात मग्न आहेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. आज ५.३० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाची अखेरच्या दिवसाच्या प्रचाराची लगबग आहे. सर्व राजकिय पक्ष एकमेकांवर टीकांच्या फैरी झाडत आहेत. काल या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्यांनी जीएसटी, नोटाबंदी, महागाई या मुद्द्यावर भाजपा सरकारला टार्गेट केले. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपली सभा घेतली.
नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच या ठिकाणी सभा पार पडली. त्यामध्ये त्यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक भाषण करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांवर निशाणा साधला. अजूनही इथल्या नागरिकांना घरांची गरज आहे, पण अशोकराव स्वत:चेच भले करण्यात मग्न आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. शिवसेना सत्तेत येण्यासाठी नाही तर केवळ भाजपला पराभूत करण्यासाठी लढत अाहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर गेला आहे. नांदेडमध्ये काँग्रेसकडून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. तर शिवसेनेचे नेते सुद्धा रॅली काढून सभा घेऊन प्रचारात जोर लावत आहेत.अखेरचा दिवस कॅश करण्यासाठी सर्वच पक्ष जोमानं कामाला लागल्याचे चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे.