सुटीवर आलेल्या जवानाकडून गर्भवती पत्नी, 4 वर्षांच्या मुलीची हत्या; स्वतःच गाठले पोलीस स्टेशन
Nanded Crime : गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता.
सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : भारतीय सैन्यदलातील (Indian Armay) एका सैनिकाने नांदेडमध्ये (Nanded Crime) गर्भवती पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबियांची हत्या केल्यानंतर आरोपी सैनिक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सैन्यदलातील सैनिकाने हे कृत्य का केले याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस (Nanded Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सैनिक असलेल्या पतीने पत्नी आणि मुलीला गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी एकनाथ जायभाये याने 23 वर्षीय पत्नी भाग्यश्री आणि 4 वर्षीय मुलगी सरस्वती यांची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी एकनाथ जायभाये स्वतः माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ जायभाये याची पत्नी भाग्यश्री आठ महिन्यांची गर्भवती होती.
राजस्थानमधील बिकानेरमध्ये एकनाथ जायभाये नियुक्त आहे. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एकनाथ जायभाये याने पत्नी भाग्यश्री आणि चार वर्षाची मुलगी सरस्वती या दोघेही झोपेत असताना त्यांची गळा आवळून त्यांची हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीने माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. दरम्यान हत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या झाल्याने माळाकोळी परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये पतीने झोपेतच केली पत्नीची हत्या
बुधवारी पहाटे नाशिकच्या आडगावमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पत्नी झोपेत असताना आरोपी विशाल निवृत्ती घोरपडे याने मुसळी डोक्यात टाकत तिची हत्या केली आहे. त्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र पत्नीच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.