प्रेमविवाहाला कुटुंबाचा नकार; नात्याचा संशयास्पद अंत, प्रेमीयुगुलानं स्प्राईट घेतलं अन्...
Nanded Crime : नांदेडच्या उस्माननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर प्रियकर मुलाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे मुलावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : प्रेमविवाहाला (Love Marriage) कुटुंबीयांनी नकार दिल्याने एका प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नांदेडमध्ये (Nanded News) घडलाय. यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. या घटनेमुळं नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यात ही घटना घडली आहे. भोपाळवाडी गावातील 23 वर्षीय तरुणीचे तिच्याच गावातील रोहिदास जाधव या 25 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबध होते. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची कुणकुण मुलीच्या कुटुंबीयांना लागली होती. त्यानंतर मुलाने मुलीच्या कुटुंबियांकडे जाऊन लग्नासाठी मागणी देखील घातली होती. पण मुलीच्या आईने याला विरोध करत लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर दोघेही तणावाखाली होते. त्याच तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचललं.
मुलीच्या आईने लग्नास नकार दिल्याने रोहिदास जाधव याने स्प्राईटमधून तरुणीला विष पाजले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर रोहिदास जाधवला नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. रोहिदासवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान रोहिदास जाधव याने विष पाजून मुलीचा खून केल्याची तक्रार तरुणीच्या आईने उस्मानगर पोलिसांत दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहिदासवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
"मंगळवारी उस्माननगर येथील लक्ष्मीबाई मारुती जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगी घरात झोपलेली असताना शेजारी राहणारा नातेवाईक रोहिदास पद्माकर जाधव घरात आला होता. त्याने मुलीला स्प्राईटमध्ये विषारी औषध प्यायला दिले. त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. तक्रारीनंतर रोहिदास विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिदासने सुद्धा विषारी औषध प्यायल्याने त्याच्यावर नांदेड येथील सरकारी रुग्णालायता उपचार सुरु आहेत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या प्रेमाला आईचा विरोध होता. त्यातूनच हा सगळा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे," अशी माहिती उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी दिली.
आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
दुसरीकडे वाशिम नगर परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. हनुमान गोटे असे या शिक्षकाचे नाव आहे. गोटे यांनी दीर्घ आजाराला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मनमिळावू स्वभावाचे गोटे संपूर्ण वाशिम शहरात परिचित होते. दिर्घ आजाराला कंटाळून रेल्वे समोर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे