नांदेड : क्षुल्लक कारणावरुन सख्खा भाऊ पक्का वैरी बनला. लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमधल्या तरोडा भागातील शिवराय नगरमध्ये एकनाथ तुपसमिंदर आणि सतीश तुपसमिंदर हे दोघे भाऊ शेजारी-शेजारी राहतात. दोघे ही विवाहित असून मोठा भाऊ सतीश एका कंपनीत काम करत होता तर लहान भाऊ एकनाथ नळ फिटिंगचं काम करतो. दोघा भावांमध्ये घरगुती वादामुळे खटके उडत होते. 


काल दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. सतीश एकनाथच्या घरासमोरील भिंतीच्या बाजूला असलेल्या नालीत थुंकला होता. घरासमोर थुंकला का म्हणून एकनाथने वादास सुरुवात केली. वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात एकनाथने घरातून चाकु आणून सतीशच्या छातीत वार केला.


हा हल्ला इतका गंभीर होता की सतीश रक्त्याच्या थारोळ्यात जागेवरच पडला. हल्ल्या केल्यावर एकनाथ फरार झाला.  घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेतली. जखमी सतीशला विष्णुरी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सतीशचा मृत्यू झाला.


पोलिसांनी तात्काळ शोधकार्य राबवत आरोपी एकनाथला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.