नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने मिरवणुकीला मज्जाव करणाऱ्या पोलिसांवर राग, ४ पोलीस जखमी
नांदेडमध्ये मिरवणूक काढण्यास मज्जाव केल्याच्या रागात ४ पोलिसांवर काही
नांदेड : नांदेडमध्ये मिरवणूक काढण्यास मज्जाव केल्याच्या रागात ४ पोलिसांवर काही युवकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात ४ पोलीस गंभीर जखमी आहेत. शहरात परिस्थिती आता नियंत्रणात आहे. लॉकडाऊन असल्याने शीख समाजाच्या होळीनंतर निघणाऱ्या हल्लामोहल्ला मिरवणूक कार्यक्रमाला परवानगी नव्हती. पण पोलीस आणि शीख समुदायाच्या काही महत्त्वाच्या लोकांची चर्चा झाली आणि हा कार्यक्रम थोडक्यात संपवायचा होता. तसेच मर्यादा पाळण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.
पण यातील हल्लामोहल्ला मिरवणूक कार्यक्रमातील काही शेकडो तरूणांनी नियमांची पायमल्ली करत बॅरिकेटस तोडले, यावेळी १० पोलीस जखमी झाले आहेत, तर ४ पोलीस गंभीर आहेत. शीख समुदायातील काही ज्येष्ठ मंडळींनी तणाव निवळण्यात मध्यस्थता केली. आता नांदेड शहरात शांतता आहे. हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी न दिल्याने हा राडा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी चित्रिकरण करणाऱ्यांचे मोबाईल देखील फोडण्यात आले आहेत.
नांदेड शहरात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे, रोज १ हजाराच्यावर रूग्ण सापडत आहेत, तर १७ ते १८ लोकांचा सरासरी दररोज मृत्यू होत आहे.