नांदेड : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याची निंदनीय घटना ताजी असताना नांदेड शहरातही माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. शहरात एका 50 वर्षीय महिलेचा मृतदेह रस्त्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. नांदेड शहरातील पीडित महिला भिशीचे पैसे भरण्यासाठी घराबाहेर निघाली होती. तिचा मृतदेह घराशेजारील मुख्य रस्त्यावर फुटपाथवर आढळुन आला. महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वर्दळीच्या रस्त्यावर मृतदेह फेकण्यात आल्याने नांदेड शहरात भितीचे वातावरण आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असताना आता हत्येची घटना घडल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नराधम ताब्यात 


तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये २२ वर्षांच्या एका महिला डॉक्टर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हैराबादच्या सायबराबाद स्टेशन पोलिसांनी चार आरोपींना पकडल्याचा दावा केला आहे. यामध्ये दोन गाड्यांचे ड्रायव्हर आणि एका क्लीनरचा समावेश आहे. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींनी पीडित महिलेचं अगोदर अपहरण केलं त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले. सायबराबाद पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केलीय. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेची स्कूटर जाणून-बुजून पंक्चर करण्यात आली. त्यानंतर मदतीची बतावणी करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.


रांचीत विद्यार्थीनीवर बलात्कार


झारखंडच्या रांचीतही असाच एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे.   महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याने रांची शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही विद्यार्थिनी बसस्टॉपवर आपल्या मित्रासह उभी होती. त्यावेळी सहाजणांनी शस्त्राचा धाक दाखवून तिचे अपहरण केलं आणि जवळच्याच एका गावात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या सहाजणांनी तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आपल्या आणखी सहा साथीदारांना घटनास्थळी बोलावले. त्यांनीही या तरुणीवर अत्याचार केले.