मराठा आरक्षण: नंदुरबारमध्ये कडकडीत बंद
शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नंदुरबार: मराठा आरक्षणाचा मागणीसाठी आज (सोमवार,३० जुलै) नंदुरबार शहरासह तालुका बंद ठेवण्यात आला आहे. सकाळ पासून मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते बंदचे आहवान करीत होते. बंदच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार आगराची बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बस सेवा बंद राहणार असून बाहेरगावी जाणार्या प्रवाश्याना या बंदमुळे गैरसोयीचा सामना करावा लागतोय. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सोलापूरमध्येही कडकडीत बंद
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आज सोलापुरातही बंद पुकारण्यात आलाय. या बंदला चांगला प्रतिसाद मिळातोय. सोलापूर पालिकेची परिवहन सेवा, एसटी सेवा, रिक्षा, बाजारपेठा, शाळा कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही संघटनांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात मोर्चा काढला. आज सोलापूरसह नंदुरबार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात आलाय.
फलटणमध्ये मुंडण आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी फलटणमध्ये मुंडण आंदोलन करण्यात आलं. गेल्या चार दिवसापासून फलटणच्या तहसीदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलन तीव्र करत शेकडो आंदोलकांनी सामूहिक मुंडण केलं आणि शासनाचं श्राद्ध घातलं. लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.