नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बुधवारी महाराष्ट्रातील खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील खासदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. खासदारांनीही अमित शहा यांच्यापुढे आपली गाऱ्हाणी मांडली. या सगळ्याशिवाय आणखी दोन कारणांमुळे ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीला महाराष्ट्रातील राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी हजेरी लावली होती. नारायण राणे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून गेले असले तरी त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र, आजवर भाजपला जाहीर पाठिंबा देणे टाळले होते. मात्र, या दोघांनीही दिल्लीतील बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपचे कौतुक केले. भाजपने शिवाजी महाराजांसाठी खूप मोठे काम केले आहे. या सरकारने शिवाजी महाराजांसाठी जेवढे केले तेवढे कोणत्याच सरकारने केले नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले. 



'कामाला लागा'


 'काहीही गमावून शिवसेनेशी युती केली जाणार नाही' असे स्पष्ट संकेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिले. 'शिवसेना सोबत आहे का? यावर स्पष्टता आली तर कामाला लागता येईल' असा प्रश्न एका खासदाराने उपस्थित केला. त्यावर 'काहीही गमावून शिवसेने सोबत युती केली जाणार नाही. शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात भाजप सकारात्मक आहे परंतू भाजप काही गमावून युती करणारा नाही. तुम्ही सगळ्याच जागांवर कामाला लागा' असे अमित शहा यांनी उत्तर दिले. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकणार नसल्याचे अमित शाह यांनी भाजप खासदारांना सांगितले. सर्व खासदारांनी आपआपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घ्याव्यात. २५ जानेवारी पूर्वी ही बैठक घ्यावी. २०१९ निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.