Maharastra Politics : महायुतीत मिठाचा खडा? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणेंनी थोपटले दंड
Loksabha Election 2024 : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पोस्ट करत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा (Ratnagiri Sindhudurg Constituency) भाजपकडेच राहणार असल्याचं सांगितलं आहे.
Konkan Politics : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वारं आता देशभरात वाहू लागलं आहे. अशातच महाराष्ट्रात देखील राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) खलबतं सुरू झाली आहेत. अशातच आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी 'महायुती'चा उमेदवार कोण? असा सवाल विचारला जातोय. नारायण राणे (Narayan Rane) यांना भाजप तिकीट देणार की किरण सामंत यांना निवडणुकीच्या रिंगणार उभं केलं जाईल, यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पोस्ट करत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा (Ratnagiri Sindhudurg Constituency) भाजपकडेच राहणार असल्याचं सांगितलं आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, अशी पोस्ट नारायण राणे यांनी केली आहे.
कोकणातल्या जागेवरुन महायुतीत चांगलंच धूमशान रंगणार अशी चिन्हं आहेत. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतायत, मात्र भाजपच ही जागा लढवणार असल्याचं ट्विट नारायण राणेंनी केलंय. तर दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन शिवसेनेचे उदय सामंतही आक्रमक झालेत. जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा असेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे निवडणूक लढतील अशी शक्यता आहे, तर उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतही इच्छुक आहेत.
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. 2008 सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेतून या तीन मतदारसंघांचे ‘रायगड’ आणि ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असे दोन मतदारसंघ तयार झाले होते. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मतदारसंघात आपलं वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे आता महायुतीच्या गणितात भाजप बाजी मारणार की शिंदे गट हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.