रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडला नेण्यात येत आहे. महाडच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येणार आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण आय जी संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत. आजच राणेंना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. 1 एसआरपी कंपनी , 4 डीवायएसपी, 20, पोलीस निरीक्षक, धडक कृती दल असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  दरम्यान नाशिक आणि पुणे पोलीसांच्या टीमही महाडमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याचं आक्षेपार्ह वक्तव्य राणेंनी केलं होतं. त्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राणेंना अटक करण्यात आली. तब्बल 2 तास संगमेश्वरच्या गोळवली इथं राणेंच्या अटकेचं नाट्य रंगलं. अटकेवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी आधी कार्यकर्त्यांना पांगवलं आणि नंतर राणेंना बाहेर काढलं. भाजप कार्यकर्त्यांनी राणेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. 


राणेंना आधी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथून त्यांना रायगड पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्यांना महाडमध्ये नेण्यात आलं. राणेंनी रत्नागिरी कोर्टात जामीनासाठी अर्ज केलाय. मात्र प्रकृतीच्या कारणानं राणेंचा आजचा मुक्काम महाडमधील रुग्णालयात किंवा गेस्ट हाऊसवर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.