राणे यांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा जोरदार `प्रहार`
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर डोंबिवलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर डोंबिवलीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मी शिवसेना केवळ उद्धव यांच्यामुळेच सोडली. तसेच त्यांनी बाळासाहेबांनाही जास्त त्रास दिला. त्यामुळे वडील मुलात भांडण नको म्हणून मी शिवसेना सोडली, असे प्रतिपादन राणे यांनी यावेळी केले.
मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही. मात्र, उद्धवनी जो बाळासाहेब यांना त्रास दिला तो कुठल्याच मुलाने आपल्या बापाला दिला नसेल, असा गंभीर आरोप राणे यांनी यावेळी केला. राणे भाजपमध्ये जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच मला बोलायला लावू नका,माझ्याकडे भरपूर बोलण्यासारखे आहे. तुम्हाला पळता भूई कमी होईल, असा इशारा दिलाय.
मी भाजपमध्ये जाणार मला मंत्रिपद मिळणार या भीतीने उद्धव ठाकरे घाबरले. त्यांनी फडणवीस यांच्याकडे मला भाजपमध्ये घेऊ नये यासाठी प्रयत्न केलेत. मी सुद्धा शिवसेनेत होतो आतले काय आणि बाहेरचे काय हे मला सगळे ठावूक आहे. तसेच हे सत्ता सोडणार, राजीनामे देणार अशी सातत्याने घोषणा करणारे सत्ता काही सोडत नाही. लहान मुलांचे खेळ मी खेळत नाही. मी मैदानात खेळणारा आहे, असे मत राणे यांनी यावेळी व्यक्त केले.
मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नारायण सध्या सगळ्या टीव्हीवर तूच दिसतोय, असे पवार म्हणाल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. दरम्यान, आपला अंतिम निर्णय १ ऑक्टोबरला १ वाजता जाहीर करणार असल्याची जाहीर घोषणाही राणे यांनी यावेळी केली.