मोदींना शेतकऱ्यांविषयी सहानुभूती नाही, कर्जमाफी म्हणजे लॉलीपॉप वाटते- शरद पवार
पंतप्रधान कोण हे निवडणूक झाल्यानंतरच ठरणार
अहमदनगर: काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीला पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉलीपॉप म्हणून हिणवतात. यावरून नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचे दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते रविवारी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार देशातील स्वायत्त संस्थांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला. या संस्थांना लक्ष्य करून सरकार विरोधकांना नाऊमेद करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला सगळ्यांनी एकत्र येऊन तोंड दिले पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महाआघाडीसंदर्भात भाष्य करताना म्हटले की, महाआघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नाही. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच सर्व पक्ष एकत्र येऊन पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतील, हे पवार यांनी स्पष्ट केले. २००४ सालीदेखील निवडणूक झाल्यानंतर संयुक्त पुरोगाची आघाडीची (यूपीए) स्थापना करण्यात आली. यानंतर सर्व नेत्यांनी एकत्र बसून पंतप्रधान निश्चित केला, याकडे पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी अहमदनगर महानगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या युतीसंदर्भातही भाष्य केले. भाजपला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांवर लवकरच कारवाई होईल, असे संकेत पवार यांनी दिले. या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची छुपी युती असल्याचा संदेश समाजात गेला होता. या प्रतिमेमुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे चौकशी अहवालाची वाट न पाहता पक्षाने गेलेली पत परत मिळवण्यासाठी बंडखोर नगरसेवकांना पक्षातून काढून टाकायचे ठरवले आहे.