अमरावती: नरेंद्र मोदी हे देशासाठी पंतप्रधान असतील, मात्र माझ्यासाठी ते नरेंद्रभाई आहेत. तुमच्या भावासारखी असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असणे ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले. ते शुक्रवारी अमरावती येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुक्तकंठाने नरेंद्र मोदी यांची तारीफ केली. आता अनेकजण भाजप आणि नरेंद्र मोदींविषयी माझे इतके मनपरिवर्तन कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करतील. मात्र, यापूर्वी आम्ही केलेला विरोध हा व्यक्तिगत कारणास्तव नसून जनतेच्या कामांसाठी होता. युती करतानाच या मुद्द्यांवर सहमती झाली आणि भाजपने ते मार्गीही लावले याचा आम्हाला आनंद आहे, असे उद्धव यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच शिवसेना-भाजप हे पक्ष देशातील सामान्य माणसाची शेवटची आशा आहेत. आता देशात अंधार पसरला तर देशाला तारणारा दुसरा कोणताही पक्ष नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष जरुर झाला. मात्र, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे या आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या संघर्षापेक्षा तो निश्चितच मोठा नाही. त्या काळात स्वत:ला हिंदू बोलणे शिवी देण्यासारखे होते. मी हिंदू आहे, हे बोलायला लोक घाबरायचे. ते दिवस आपल्याला पुन्हा पाहायचे आहेत का? युती झाली नसती तर आपण इतकी वर्षे ज्यांच्याशी लढा दिला त्या लोकांनाच फायदा झाला असता. आपण भगवा हातात घेऊन एकमेकांशी लढत राहिलो असतो आणि त्यांना सत्तेत बसताना बघण्याची वेळ आली असती, असे उद्धव यांनी सांगितले.


या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड, ती तुटणार नाही', असा विश्वास व्यक्त केला. युतीमुळे विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींनी घाबरून आधीच माघार घेतल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.