योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मासिक पाळी आली म्हणून विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याची धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik) समोर आला होता. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या देवगाव आश्रम शाळेत हा प्रकार घडला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाळी आलेल्या मुलींनी झाड लावलं तर ते झाड जळतं, अस म्हणत शिक्षकांनी विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं होतं. पुरोगामी महाराष्ट्रात  हे प्रकरण समोर आल्यानंतर जोरदार टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल केली.


या तक्रारीनंतर सकाळी सहा वाजताच प्रकल्प अधिकारी देवगाव आश्रम शाळेत दाखल झाले होते. मात्र शिक्षक त्यावेळी हजर नव्हते. नियमांनुसार शिक्षक मुक्कामी असणे आवश्यक होते. मात्र अधिकारी आश्रम शाळेत आल्याचे समजताच या शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. 


लवकर शाळेत पोहोचण्यासाठी वेगाने वाहन चालवत असताना या शिक्षकांचा अपघात झाला. शिक्षक शाळेत येत असताना त्यांची गाडी पलटी झाली.  या अपघातात तीन शिक्षिका या जखमी झाले आहेत. 



दरम्यान, मुख्यालायत राहणे बंधनकारक असताना एकही शिक्षक शाळेत राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार यातून उघड झाला आहे. 


पीडित मुलीच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी शाळा गाठली. अनेक शिक्षक घरी येऊन-जाऊन शाळेत शिकवत होते. अधिकारी सकाळीच पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.


अधिकारी आल्याचे समजताच हे शिक्षक त्वरीत शाळेकडे जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच शिक्षकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये आश्रमशाळेतील तीन शिक्षिका जखमी झाल्या आहेत.