नाशिक : शरणपूर परिसरात झालेल्या स्फोटाने महापालिकेचे तिबेटीयन मार्केट शनिवारी पहाटे हादरून गेले. अवैधरित्या गॅस भरताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, स्फोटात कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेत ९ दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील अनेक इमारतींना हादरा बसला व खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्याच्या ठिकाणी काही सिलिंडर आढळून आले आहेत. पहाटेच्या निरव शांततेवेळी अचानकच झालेल्या शक्तीशाली स्फोटाच्या अवाजाने परिसर दणानून गेला. प्रचंड मोठ्या आवाजामुळे नागरीकही घाबरून गेले.


पहाटेची वेळ असल्यामुळे अद्याप अंधार कायम होता. त्यामुळे नेमके काय झाले आहे याचा अंदाजही नागरिकांन येत नव्हता. या सगळ्या गोंधळात या घटनेची माहिती पोलिसांना कळेपर्यंत एक तास उलटून गेला होता. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी आले.  दरम्यान, काही दिवसांपूर्वीच परिसरात जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यामुळे हा कोणता घातपाताचा तर प्रकार नाही ना, अशी शंका आल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. हा तपास करण्यासाठी  पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्यासहीत बॉम्ब शोधक-नाशक पथक तातडीने दाखल झाले. या पथकासोबत फॉरेंन्सिक लॅबचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. पोलिसांनी केलेल्या एका तपासात इथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठाही सापडला होता. तर, पाचच दिवसांपूर्वी जवळपास १७ डिटोनेटर्स आणि जिलेटीनच्या ६० कांड्याही पोलिसांना आढळून आल्या होत्या. हा प्रकार वडाळा पाथर्डी रोडवर आढळून आला होता. पोलिस अद्यापही या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यानच, स्फोटाची ही घटना घडली त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आहे.