सागर गायकवाड, झी मीडिया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nashik News Today:  शहरात मोक्याच्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी वा बंगला असेल तर सावधान... त्याला बळकवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. नाशिक शहरात महागड्या कॉलेज रोडला असलेल्या बंगला बळकवण्यासाठी एका बिल्डरने जे काही केलं ते पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघड झाला. 


नाशिकच्या कॉलेजरोड उच्चभ्रू परिसरातील तपस्वी नावाचा बंगला आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या बंगल्यामध्ये अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक असलेले शशी कुमार तपस्वी आपल्या वृद्ध पत्नीसोबत  एकटेच राहतात. 16 तारखेला  यावेळी चार ते पाच अनोळखी युवकांनी बंगल्यात शिरून चाकूहल्ला केला. तसंच, त्यांना धमकावत ५५ हजारांची रोकड, दोन मोबाइलसह पावणे पाच लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला होता


तपस्वी यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी पोलीस चक्र फिरवून या संशयितांचा शोध सुरू केला. त्यानंतर ही सगळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. चक्क बंगला खाली करण्यासाठी एका बिल्डरने हा पराक्रम केल्याचं समोर आला आहे. अजित प्रकाश पवार असं या बिल्डरचे नाव आहे. 


उच्चभ्रू परिसरातील या प्रॉपर्टीला नाशिक शहरात सर्वाधिक भाव आहेत. बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्यावर दबाव टाकण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने मजुरीचे काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह संदीप रणबाळे आणि महादेव खंदारे या तिघांना सुपारी दिली. रात्रीच्या वेळी त्यांच्यावर गेल्या आठवड्यात हल्ला घडवून आणला. चाकूने वार करत घरातील दागिने, मोबाईल, मालमत्तेची कागदपत्रे आणि ईतर मुद्देमाल चोरी केला. पोलिसानी  या  प्रकरणात बिल्डर अजित पवारांसह चौघांना अटक केली आहे.


सध्या परदेशात जाऊन नोकरी करण्याची फॅशन सर्वसामान्य कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र याचा फायदा घेत अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जे वृद्ध घरी एकटे राहतात त्यांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन जाहीर करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.