नाशिक: राज्यभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतरही अनेक नागरिक अजूनही बेफिकिरीने वागत असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये होम क्वारंटाईन केलेले कुटुंब फरार झाले आहे. ही माहिती समोर  आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इगतपूरी येथे राहणाऱ्या या कुटुंबातील चार जण काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातून परतले होते. यावेळी त्यांची विमानतळावर तपासणी झाली होती. यानंतर त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आज वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करायला गेल्यानंतर हे कुटुंब घरातच नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी आजुबाजूला चौकशी केली असता काहीजणांनी हे कुटुंब फिरायला गेल्याची माहिती दिली. त्यामुळे कोरोनाच्या धोक्याविषयी वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकायला तयारी नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी सध्या या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या चौघांना ताब्यात घेऊन आता त्यांची रवानगी रुग्णालयातील कक्षात केली जाईल. तसेच या चौघांवर कायदेशीर कारवाईही होण्याची शक्यता आहे. 

कालच बोरिवली रेल्वे स्थानकात होम क्वारंटाईन केलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. सिंगापूरमधून परतल्यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या सहा प्रवाशांना आज ताब्यात घेण्यात आले. हे सर्वजण मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करत होते. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटली. मात्र, यामध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर सौराष्ट्र एक्स्प्रेस बोरिवली स्थानकात थांबवण्यात आली. यानंतर या सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवण्यात आले. 

तत्पूर्वी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आलेले चार जण आढळून आले होते. तिकीट तपासनीसाला यांच्या हातावरचा होम क्वारंटाईनचा शिक्का दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर या चौघांना पालघर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले होते.