सख्खा मित्र ठरला पक्का वैरी! 500 रुपयांसाठी धारदार शस्त्राने वार... जागीच मृत्यू
Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाचशे रुपयांच्या मोबालईसाठी मित्राने सख्ख्या मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. याप्रकरणी संशयीत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : Nashik Crime: अवघ्या पाचशे रुपयांसाठी मित्रानेच मित्राला संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. मोबाईल देण्यघेण्या वरून मित्रानेच मित्राचा धारधार शस्त्राने खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशि मधील भारत नगर भागात ही घटना घडली असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात (MumbaiNaka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खुनाचे हे आहे कारण
संशयित अकिब उर्फ गुरफान इद्रिस सय्यद (28, रा. भारतनगर) आणि परवेझ अय्युब शेख (31, रा. भारतनगर) हे दोघ मित्र होते. आर्थिक अडचण असल्याने संशयित अकिब उर्फ गुरफान इद्रिस सय्यद याने स्वतःचा मोबाइल परवेझ अय्युब शेख याला विकला होता. बुधवारी अकिबने विकलेला मोबाइल परत देण्याची मागणी केली. मात्र, पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाले. आणि या वादात संशयित अकिब याने आपल्या जवळच्या धारदार शस्त्र परवेज याच्यावर वार केले. परवेज रक्तबंबाळ झाला होता. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
संशयीत आरोपीला अटक
परवेजच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्यानंतर अकिब पळ काढण्याचा प्रयन्त केला. मात्र, नागरिकांनी त्यास पकडले. त्यावेळी इथून गुन्हे शाखेचे अंमलदार अप्पा पानवळ हे जात असताना त्यांनी आकिबला ताब्यात घेतलं. यानंतर त्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक व मुंबईनाका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकिब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अकिब यास न्यायालयात हजर केलं असता, त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जामनेरमध्ये पोलीस स्थानकावर दगडफेक
दरम्यान, जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांची विविध पथके तयार करत काल भुसावळ इथून आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामनेर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक केली. या दगडफेकीत तब्बल 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी 6 पोलीस कर्मचारी अजूनही खाजगी रुग्णालयात दाखल झालेले आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून व्हिडिओ फुटेज तपासून अजून काही आरोपी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. जनतेने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत कायदा हातात न घेता कोणत्याही प्रकारच्या अफेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी यांनी केलं आहे.