आरोग्यदूतच निघाला `गुटखा किंग`! महाराष्ट्रभरात सप्लाय चैन; बड्या अधिकाऱ्यांशीही होती `सेटींग`
Nashik Crime : नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपी तुषार जगताप या आरोग्यदुताला गुटखा विक्रीच्या प्रकरणात अटक केली आहे. आरोपी तुषार जगतापचे पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक तसेच अनेक पोलीस अधीक्षकांशी जवळचे संबंध होते हे सर्वांनाच माहिती होतं. त्यातच आता तुषार जगतापच राज्यातील गुटखा माफिया असल्याचे समोर आले आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik Crime) शहरात विविध पक्षांमध्ये सक्रिय पदांवर राहिलेला आणि सामाजिक कार्य करणारा आरोग्यदूत तुषार जगताप (tushar jagtap) हाच राज्यातील गुटखा माफिया (gutkha mafia) निघालाय. तत्कालीन पोलीस अधीक्षकांसह राजकारणातील बड्या नेत्यांसोबत संबंध असलेल्या तुषार जगतापला नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) अखेर अटक केली आहे. महिनाभरापूर्वी कंटेनरने वाहतूक करताना इगतपुरी तालुक्यात सव्वा कोटी रुपयांचा गुटखा पकडण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी केली असता याचा मुख्य सूत्रधार राज भाटिया असल्याचे समोर आले होते.
मात्र राज भाटियाचे राज्यातील नेटवर्क तुषार जगताप याच्यामार्फत चालवत असल्याचं कबुली त्याने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तुषार जगपातला अटक केली आहे. तुषार जगतापचे पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक तसेच अनेक पोलीस अधीक्षकांशी जवळचे संबंध होते. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या सोबत तो वावरत असे. कोरोना काळात आपली स्वतःची भूमिका आरोग्यदूत म्हणून प्रसिद्धी करणारा हा भामटा राज्यात बंदी असताना गुटख्याच्या रूपाने तरुणाईचं आरोग्य खराब करत असल्याचे समोर आला आहे. मोठमोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने वावरणाऱ्या या बहुरूपीचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
26 मे 2023 रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यातील पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईच्या बाजूने जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडले होते. या कंटेनरमधून पोलिसांनी सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केला होता. अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राज किशनकुमार भाटिया असल्याचे समोर आले होते. त्यानंतर 23 जून रोजी पोलिसांनी राज भाटियाला जयपूर येथून अटक केली होती. अटकेनंतर राज भाटियाकडे कसून चौकशी करण्यात येत होती. आरोपी राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून कंटेनरद्वारे गुटख्याची देशातील विविध राज्यांमध्ये तस्करी करत असल्याचे समोर आले.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी राज भाटिया हा नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गुटखा तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षांपासून फरार असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान आरोपी राज भाटियाने खळबळजनक माहिती दिली. आपण 2021 पासून नाशिकच्या तुषार जगतापसोबत संपर्कात होता. तुषार जगतापच्याच मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे नेटवर्क चालवले जात होते, अशी कबुली राज भाटियाने दिली. त्यानंतर पोलिसांनी तुषार जगतापला बेड्या ठोकल्या आहेत.