योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime) पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. परस्पर तक्रार देण्यासाठी आलेल्या या पोलीस (Nashik Police) ठाण्यातच एकमेकांना भिडल्याने एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर दोघांचे भांडण सोडवण्यात महिला पोलिसांना यश आले. मात्र आता पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन महिलांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी सुरु झाल्याने पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. परस्पर विरोधी तक्रार करण्यासाठी दोन्ही महिला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने त्या दोन्ही महिला पोलिसांसमोर आपसातच भिडल्या. दोघांमध्ये तुफान हाणामारी सुरु झाली. महिला असल्याने कोणालाही त्यांचे भांडण सोडवता येईना. शेवटी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही महिलांचे भांडण सोडवले


पतीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून दोन्ही महिला एकमेकींविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी सुरु झाली. शनिवारी रात्री नाशिक रोड पोलीस ठाण्याचे आवारातच हा सगळा प्रकार घडला आहे. नाशिक रोड पोलिसांनी दोन्ही भांडण करणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



बीडमध्ये महिला कंडक्टरला प्रवाशाकडून मारहाण


बीडमध्ये काही दिवसांपूर्वी महिला कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं होतं. बस का थांबवली नाही असं असा जाब विचारून महिला कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या धारूर आगारात घडला होता. महिला कंडक्टरला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबाजोगावरून बस (एमएच 20, बीएल 125) धारूर आगारात आली असता महिला प्रवाशाने कंडक्टरला ‘अंबाजोगाईत बस का थांबवली नाही’ यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कंडक्टर संगीता दिनकर कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैशाली अशोक चिरके रा. जहागीरमोहा, ता. धारूर यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.