Nashik Crime : चोरीची तक्रार, अपहरण अन् कपड्यांची पावती... योगेश मोगरे हत्याकांडाचा गुंता अखेर सुटला
Nashik Crime : नाशिकच्या बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणाचा अखेर नाशिक पोलिसांनी उलघडा केला आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचा शोध सुरु आहे.
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) काही दिवसांपूर्वी एका कंपनीत CEO पदावर असलेल्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हल्ला करत करत खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. हत्येनंतर आरोपींनी मृत व्यक्तीची कार घेऊन पळ काढला होता. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींची ओखळ पटवली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
गाडी चोरण्याच्या उद्देशाने नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कंपनीत CEO पदावर असलेल्या योगेश मोगरे यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. नाशिकमधील पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या आंगण हॉटेलजवळ काल 24 मार्च रोजी योगेश मोगरे यांची कार अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर धारधार हत्याराने वार केले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांची कार घेऊन पळ काढला होता. याच रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षा चालकाने योगेश मोगरे यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता.
तपासानंतर नाशिक पोलिसांनी हरियाणामधून एका संशयित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचा शोध सुरु आहे. योगेश मोगरे हॉटेलबाहेर उभे असताना दोन्ही आरोपींनी त्यांची गाडी चोरण्याचा प्रयत्न केला.
मोगरे यांनी विरोध करताच आरोपींना त्यांच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने मोगरे यांच्यावर वार केले. त्यांनतर दोघेही संशयित मोगरे यांची कार घेऊन पसार झाले होते.
पोलिसांना ही कार बेळगाव कुर्हे येथे आढळून आली होती. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास गुन्हे शाखा दोनकडे देण्यात आला होता. त्यांनतर गुन्हे शाखेची एकूण सहा पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली होती. साक्षीदार, सीसीटीव्ही आणि काही भौतिक पुराव्यांच्या आधारे गुन्हे शोध पथकाने हरियाणा येथून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अल्पवयीन संशयित आणि त्याचा आणखी एक साथीदार हे हरियाणा येथून मुंबई येथे अपहरणाच्या उद्देशाने आले होते. यासाठी त्यांना एका गाडीची गरज होती. मात्र ती मुंबईत न मिळाल्याने ते नाशिकला आले होते. नाशिकमध्ये मोगरे यांची हत्या केल्यानंतर त्यांची गाडी पळवली होती, अशी माहिती आरोपीने दिली.
घटनास्थळी तपास करताना पोलिसांना 80 मीटरवर संशयास्पद एक पिशवी दिसून आली होती. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये नवीन कपडे आणि खरेदीची पावती आढळून आली होती. त्या पावतीवर एक मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. त्या मोबाईल क्रमांकाचाही पोलिसांना तपासात मोठा फायदा झाला.
पोलिसांनी काय सांगितले?
"23 मार्च रोजी नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील तक्रारदाराचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआर याच्या आधारे तपास करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील दोन आरोपींची ओखळ पटली असून ते हरियाणातील असल्याचे समोर आले आहे. लवकर आरोपीला अटक करण्यात येईल. आरोपी हे हरियाणातून मुंबईत आले होते. त्यांना अपहरणासाठी एका गाडीची गरज होती. मुंबईत त्यांना ते जमले नाही म्हणून ते नाशिकला आले. आरोपींनी मयताकडून गाडीची चावी हिसकावून घेत असताना त्याने विरोध केल्याने चाकून त्याच्यावर वार केले," अशी माहिती नाशिक पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.