मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक : नाशिकसह राज्यभरातील रस्ते खड्यात गेलेत. रस्त्यावरच्या खड्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या कारही बे'कार' झाल्यात.. वाहन पासिंग करताना सरकारकडून लाखो रुपयाचा कर वसूल केला जातो. मात्र त्या दर्जाचे रस्ते बनवले जात नसल्याने कोट्यवधी रुपयांची कार अक्षरशः शोभेची वस्तू झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सागर गिरासे यांनी अडीच वर्षांपूर्वी जग्वार कंपनीची एक कोटी ४० लाख रुपयांची प्रीमियम क्लासमध्ये मोडणारी कार खरेदी केली. इम्पोर्टड कारची हौस असल्याने महागड्या कारसाठी गिरासे कुटुंबियांनी पैसे तर मोजले, मात्र त्याचा उपभोग त्यांना आजतागायत घेता येत नाहीये.


नाशिकसह राज्यभरातील खड्याचे रस्ते याला मुख्य कारण ठरतायेत. लक्झरियस कारची रस्त्यापासूनची उंची कमी असल्याने थोड्याही खड्यातून गाडी गेली तरीही गाडी रस्त्यावर आदळते. त्यामुळे  रस्त्यावर दीड दोन फुटाचे खड्डे असल्याने गाडी बाहेरगावी घेऊन जाता येत नाही.


अडीच वर्षापासून घरापासून कंपनीपर्यंत आणि पुन्हा कंपनीपासून घरापर्यंत असा केवळ दहा ते पंधरा किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. या कालावधीत फक्त दहा हजार किलोमीटर एवढाच प्रवास कारने केला. सर्विसिंगसाठी गाडी औरंगाबादला जरी पाठवायची असली तरी ती एखाद्या कंटेनरमधून पाठवावी लागते. त्यासाठी ६ ते ७ हजार रुपयये मोजावे लागतात.


महाराष्ट्रात चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्याने कार रस्त्यावर चालवता येत नाहीत. त्यामुळे जर सरकार चांगल्या दर्जाचे रस्ते मुलभूत सुविधा देऊ शकत नसेल तर आरटीओने अशा कारचं पासिंग करूच नये. सरकारला लाखो रुपयाचा दिलेला कर परत करावा अशी मागणी केली जात आहे.  येत्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील रस्त्यांची काम हाती घेतली जातील असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं.


रस्त्यावरील खड्यांची समस्या ही प्रत्येक शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यात बघयला मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबर पर्यंत रस्ते दुरुस्त करण्याचे अल्टिमेटम दिलाय, त्यानंतर जर महाराष्ट्र खड्डेमुक्त झाला नाही तर नागरिकांच्या रोषाला सरकराला सामोर जावं लागण्याची शक्यता व्यक्त होतेय.