COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी निश्चित केलेल्या कर योग्य मूल्यवाढीविरूद्ध नाशिक मनपा महासभेत रणकंदन झालं. महापालिका सभागृहासह बाहेरही आंदोलनं झाली. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेनं या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत भाजपविरोधात रणशिंग फुंकलं. आंदोलनांनंतर आयुक्तांनी केलेल्या करवाढीला स्थगिती देण्यात आली आणि हा ठराव स्थायी समितीत गेला आहे. 


नाशिक मनपाबाहेर प्रवेशद्वारावरच शेतक-यांनी आंदोलन केलं. पिवळ्या आणि हिरव्या पट्ट्यात कर पट्ट्यात कर वेगवेगळा लावलाय, मग भाजीपाल्याचा दरही वेगवेगळा ठेवायचा का? कर न आकारता आमच्या जमिनी महापालिकेनेच ठेऊन घ्या आणि आम्हाला वर्षाला कराएवढे पैसे द्या, अशा मागण्या शेतक-यांनी केल्या. शिवसेनेसह विरोधीपक्षांनी या आंदोलनात सहभाग घेत राम राम भजन करत भाजपविरोधी भूमिका मांडली. 


बाहेर जनता संतापली असताना आत सभागृहातही सर्वच पक्षातील नगरसेवक संतापले होते. तुकाराम मुंढे यांचा एककल्ली कारभार संतापाचं कारण होता. करवाढीवरून नगरसेवकांनी प्रशासनावर भडीमार केला. मात्र तुकाराम मुंढे मात्र महासभेला गैरहजर राहिले.


मुख्यमंत्र्यांना साकडं घालण्याचं सांगत भाजपने महासभा गुंडाळली. मात्र कर अधिका-याने मात्र आपल्या करसूत्राचं समर्थन केलंय. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किमान महिनाभर नाशिककरांवर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय स्थायी समितीतच होणार आहे.